कोल्हापूर-सोलापूर दिवसा धावणार
मिरज - कोल्हापूर-सोलापूर रेल्वेमार्गावर दिवसासाठी पॅसेंजर गाडी सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पुणे-सोलापूर पॅसेंजर पुढे कोल्हापूरला आणि मिरज-कुर्डुवाडी पॅसेंजर पुढे सोलापूरला सोडण्याचा अधिकाऱ्यांचा प्रस्ताव आहे. तसे झाल्यास कोल्हापूर-सोलापूर-कोल्हापूर एक्स्प्रेस नसल्याची उणीव भरून निघण्याची आशा निर्माण झाली आहे.
कोल्हापूर-सोलापूर-कोल्हापूर ही भरगच्च गर्दीची गाडी रात्री सोडली जाऊ लागल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. दिवसा या मार्गावर एकही गाडी नसल्याने गैरसोय होते आहे. ही गाडी पूवर्वत दिवसा सोडावी यासाठी पाठपुरावा सुरू आहे. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांपर्यंत निवेदने गेली. या पार्श्वभूमीवर दिवसा अन्य पर्यायाचा विचार गतीने सुरू झाला आहे. पुण्यातून रात्री साडेदहा वाजता सोलापूरसाठी पॅसेंजर निघते....
more... ती सकाळी सात वाजता सोलापुरात पोहोचते. परत साडेआकरा वाजता पुण्याला निघते. सायंकाळी सात वाजता पोहोचते. ही गाडी कोल्हापूरसाठी वापरण्याचे नियोजन आहे. पुण्याहून सकाळी सोलापुरात आलेली पॅसेंजर पुढे कोल्हापुरला सोडण्याचे नियोजन आहे.
मिरजेतून सकाळी सहा वाजता कुर्डुवाडी पॅसेंजर निघते. ती पुढे सोलापूरपर्यंत सोडण्याचे नियोजन आहे. तेथून ती पूर्ववत पुणे पॅसेंजर म्हणून निघेल. मिरज-कुर्डुवाडी पॅसेंजर कदाचित कोल्हापुरातूनही सोडली जाण्याची शक्यता आहे. तिच्या वेळेतही बदल होऊ शकतो. कोल्हापूर-सोलापूर-कोल्हापूर एक्स्प्रेस रात्री सोडल्या जात असल्याने रेल्वेला लाखोंचा फटका बसत आहे. अवघ्या पन्नास-शंभर प्रवाशांसह ती धावते आहे. स्लिपरचे डबे तर रिकामेच असतात. वर्षात आठ कोटी रुपये मिळवणाऱ्या या गाडीला उत्पन्नाच्या दृष्टीने घरघर लागली आहे. तिला क्रमांक मिळालेला असल्याने ऐनवेळी रद्द केली जाऊ शकत नाही. उपाय म्हणून दिवसा पॅसेंजरच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.